Ad will apear here
Next
भावनांवर नियंत्रण ठेवा...


आजही आपल्याकडील कित्येक आई-वडिलांच्या डोक्यात पत्रिका, कुंडली या गोष्टींचं भूत असतंच. मुलांची लग्नं जुळवताना या बाबींना आजही महत्त्व दिलं जातं. परंतु या सगळ्याला कितपत बळी पडायचं, याबाबत किती भावनिक व्हायचं, याचा मात्र गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण असणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल....
............................
कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी संजना काही दिवसांपूर्वी स्वतःहून भेटायला आली. आल्यावर तिने स्वतःची ओळख करून दिली. ती वाणिज्य शाखेत शिकत असून, सीए होण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी ती तयारीदेखील करत आहे; पण तिची आई मात्र या सगळ्याच्या विरोधात आहे. आईचं म्हणणं असं आहे, की ‘मी तुझं लग्न करून देणार आहे. लग्नानंतर तू तुझं करिअर कर. आता मी तुझी जबाबदारी आणखी नाही पेलू शकत.’ हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. 

‘मॅडम मला अजून शिकायचंय. चांगलं करिअर करायचंय. घरची परिस्थिती बदलायची आहे. माझे वडील एका अपघातात अचानक गेले. त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा आई घराबाहेर पडली आणि तिने कसंबसं घर चालवलं. ताईचं लग्न लावून दिलं आणि आता माझ्या मागे लागली आहे. ती सतत याच चिंतेत असते. नातेवाईकही सतत स्थळं घेऊन येतात. असं वाटतंय, की निघून जावं घरातून. तिची रोजची चिडचिड, आरडओरडा, आजारपण, सारखा तोच तोच विषय याचा कंटाळा आलाय आता.’ 

तिचं बोलून झाल्यावर तिला थोडं शांत होऊ दिलं. मग तिच्याशी बोलायला सुरुवात केली. यातून असं लक्षात आलं, की संजनाच्या मोठ्या बहिणीचं एका मुलावर प्रेम होतं. ती त्याच्यामध्ये भावनिकदृष्ट्या खूप गुंतली होती. म्हणून आईने त्या दोघांची पत्रिका दाखवली. आईचा पत्रिकेवर खूप विश्वास. त्या दोघांची पत्रिका जुळत नाही, हे कळल्यावर आईने त्यांचं भेटणं बंद केलं. तिने बहिणीची आणि जोडीला संजनाची पत्रिका परत दाखवली, तेव्हा तिला असं सांगितलं गेलं, की दोन्ही मुलींच्या पत्रिका सदोष असून त्या दोघींची लवकरात लवकर लग्नं केली नाहीत, तर त्यांच्या बाबतीत अनेक वाईट गोष्टी घडू शकतात. त्यांच्याकडून चुकीची पावलंही उचलली जाऊ शकतात. तेव्हापासून तिच्या आईनं हेच डोक्यात ठेवलं आहे. याच काळजीपोटी संजनाच्या ताईचं लग्न तिने लवकर करून टाकलं. बोलणं झाल्यावर संजना थोडी शांत झाली. तेव्हा तिला आईला भेटायला घेऊन येण्यास सांगितलं. 

काही दिवसांनी संजनाची आई भेटायला आली. त्यांची ओळख करून घेऊन भेटायला बोलवण्यामागील कारण सांगितलं. यानंतरचं पूर्ण सत्र संजनाची आईच बोलत राहिली. जे संजनाने मागील सत्रादरम्यान सांगितलं, तेच सगळं आईने अधिक सविस्तरपणे सांगितलं. ‘पत्रिका’ या गोष्टीचा आईवर इतका प्रभाव होता, की आई आपल्या भावनांवरचं, विचारांवरचं नियंत्रण गमावून बसली होती. घडणाऱ्या सगळ्या घटनांचा याच्याशीच संबंध असल्याची पक्की समजूत तिच्या मनात रुतून बसली. याचा परिणाम म्हणजे आईला काही मनोकायिक आजार निर्माण झाले. घरात मुलीबरोबर तिचे सतत वाद व्हायचे, तिने नोकरीही सोडून दिली होती, मुलींचं लग्न आणि सदोष पत्रिका याव्यतिरिक्त विचार करणं तिला अशक्य झालं होतं. तिचा हा विश्वास इतका दृढ होता, की याव्यतिरिक्त बोलला जाणारा कोणताही मुद्दा ती मान्य करू शकणार नव्हती. आईच्या मनात असलेले हे सगळे समज दूर करणं गरजेचं होतं. त्यासाठी काही दिवसानंतर संजनाच्या आईला पत्रिका घेऊनच भेटीसाठी बोलावलं. 

त्यानुसार काही दिवसातंच आई पुन्हा सत्रासाठी आली. या सत्रात संजनाच्या आईला पत्रिकेच्याच दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीला बोलावलं होतं. त्या व्यक्तीने संजनाची पत्रिका पाहून, त्याचा अभ्यास करून नंतर आईला संजनाच्या पत्रिकेतील चांगल्या-वाईट गोष्टींची अतिशय सविस्तर माहिती दिली.  तिच्या शंकांचं समाधान केलं आणि संजनाच्या आईच्या मनातील पत्रिकेचा बागुलबुवा हळू हळू कमी झाला. 

संजनाच्या आईची समस्या सोडवण्यासाठी याबरोबरच समुपदेशनाची सत्रंदेखील घेतली. पुढे पत्रिकेचा बागुलबुवा दूर झाल्याने अति चिंता, अति ताण यातून ती बाहेर पडली आणि विचार करण्यासाठी सक्षम झाली. तसं पाहता ही केस अनेक कंगोऱ्यांतून अभ्यासता येईल; पण या सत्रांमुळे संजनाच्या आईला तिचे भावनिक व विचारांवरील नियंत्रण परत मिळवता आले. अर्थातच त्यामुळे निर्माण झालेल्या इतर समस्या आपोआपच सुटल्या. संजनाच्या आईला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी पूरक असा हा अनोखा प्रयोग खूप उपयोगी ठरला. ज्यामुळे आईची समस्या अगदी मुळापासून दूर झाली. 

(केसमधील नाव बदलले आहे.)

- मानसी तांबे – चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZVTBP
Similar Posts
मूल वयात येताना... हार्दिक ज्या वयाचा होता, त्याच वयाचे त्याचे मित्रही होते. त्यामुळे अनेकविध अनावश्यक विषयांवर होणाऱ्या गप्पा, चर्चा, अयोग्य, चुकीच्या माहितीची देवाण-घेवाण, मुलांकडून मिळणारे चुकीचे सल्ले, स्वतःला जाणून घेण्याची उत्सुकता, अनेक प्रकारांनी आपण मोठे झालो आहोत, हे सिद्ध करण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि आई-वडिलांकडून
नकारात्मक विचारांनी मुलं गमावतात आत्मविश्वास आता आपण कधीच पूर्वीसारखे छान बोलू शकणार नाही, अशी भीती त्याच्या मनात बसली. हा नकारात्मक विचार त्याच्या मनात इतका पक्का बसला, की त्याने, आपण छान बोलू शकतो हा विश्वासच गमावला. एका वाक्याने त्याच्या मनात अनेक नकारात्मक विचार पेरले गेले... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या नकारात्मक विचारांचा मुलांवर होणाऱ्या परिणामाबद्दल
मुलांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा.. वयात येणं हा प्रत्येकाच्याच आयुष्यात येणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या गोष्टीला प्रत्येकालाच सामोरं जावं लागतं. याविषयीची शास्त्रीय माहिती योग्य वेळेत मिळाली तर मुलं चुकीच्या दिशेला जाण्यापासून रोखली जाऊ शकतात. म्हणूनच मुलांना योग्य माहिती देणे हे पालक म्हणून आपलं काम आहे... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू वयात येणाऱ्या मुलांच्या समस्यांबद्दल
केवळ हट्ट पुरविणे म्हणजे पालकत्व नव्हे! आपले मूल हे प्रत्येक पालकाचेच लाडके असते. त्यामुळे मूल हा प्रत्येकाचाच ‘वीक पॉइंट’ असतो. मुलांचे हट्ट पुरविले जाणे साहजिकच असते; मात्र हट्ट पुरविण्यातही सारासार विचार करणे गरजेचे असते. मुलांना नकार, बंधने, नियम या गोष्टींचीही सवय आणि माहिती असायला हवी. त्यांच्याशी नियमितपणे संवाद असायला हवा आणि त्यांच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language